‘या’ देशामध्ये अस्वलाने केला बाप-लेकावर हल्ला, न्यायालयाने सुनावली मृत्यूदंडाची शिक्षा

पोलिसनामा ऑनलाईन – इटलीमध्ये एका अस्वलाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वडील आणि मुलावर हल्ला केल्याच्या आरोपातून अस्वलाला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. दुसरीकडे प्राणीप्रेमी संघटनांनी यावर संताप व्यक्त केला असून अस्वलाच्या बचावासाठी पुढे सरसावल्या आहेत.

फेबिओ मिस्सरोनी हे 28 वर्षांचा मुलगा क्रिश्चियन याच्यासोबत माउंट पेलरच्या रस्त्याने जात होते. त्यावेळी अचानक त्यांच्यावर अस्वलाने जीवघेणा हल्ला केला. क्रिश्चियनने सांगितले की, अस्वलाने माझा पाय पकडला होता. मला अस्वलाच्या तावडीतून सोडवण्यासाठी वडिलांनी त्याच्या पाठीवर उडी मारली. त्यामुळे मी अस्वलाच्या तावडीतून सुटलो पण माझ्या वडिलांच्या पाय तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाला आहे. बर्‍याच प्रयत्नांनंतर आम्ही कसेबसे अस्वलाच्या तावडीतून सुटलो. दुसरीकडे, या घटनेनंतर ट्रेटिनो येथील गव्हर्नर मोरिजियो फुगत्ती यांनी कठोर निर्णय घेताना अस्वलाला मारुन टाकण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. तर, प्राणीप्रेमी संघटना अस्वलाच्या बचावासाठी पुढे सरसावल्या आहेत. अस्वलाने त्याच्या पिल्लांना वाचवण्यासाठी हल्ला केला असू शकतो, असे प्राणीप्रेमी संघटनांचे म्हणणे असून त्यांनी अस्वालाच्या बचावासाठी ऑनलाइन मोहिम सुरू केली आहे.