कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा ‘प्लॅटफॉर्म’ तिकीटाबाबत मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून देशात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोना रुग्णसंख्येत उच्चांक गाठला आहे. देशात महाराष्ट्रात कोरनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर या शहरामध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. मुंबईत देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर मध्य आणि पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर आता ‘प्लॅटफॉर्म तिकीट’ बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि राज्यातील स्थलांतरीत कामगार पुन्हा आपल्या मूळ गावी परतू लागले आहेत. दादर, मुंबई सेंट्र, कुर्ला टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे टर्मिनस आणि बोरवली येथे स्थलांतरीत मजूर आपल्या मूळ गावी जाणाऱ्या ट्रेन पकडण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. यामध्ये आगामी काळात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच कामगारांना सोडण्यासाठी येणाऱ्यांच्या संख्येमध्येही वाढ होत असल्याने रेल्वेने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेत ‘प्लॅटफॉर्म तिकीट’ बंद केले आहे.

कोणत्या स्थानकावर ‘प्लॅटफॉर्म तिकीट’ बंद ?

कोरोनाचा प्रदुर्भाव वाढत असल्याने आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोरोना फैलाव रोखण्यासाठी मध्य रेल्वेने ‘प्लॅटफॉर्म तिकीट’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर संजीव मित्तल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या मध्यमातून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल या स्थानकांवर आता यापुढे प्लॅटफॉर्म तीकीट मिळणार नाही. तात्काळ प्रभावाने हा निर्णय लागू करण्यात येत असल्याची माहिती मित्तल यांनी दिली.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर रेल्वे स्थानकावर मोठ्या गर्दीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. परंतु हे खरे नसून कोणीही अशा प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करु नयेत. तसेच अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. तसेच मे महिन्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असण्याची शक्यता असल्याने विविध ठिकाणी जाणाऱ्या आणखी काही रेल्वे सुरु करण्यात येणार आहेत. मात्र, फक्त कन्फर्म्ड तिकीट असणाऱ्यांना प्रवास करता येणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.