अमेरिकेच्या CDC चा मोठा खुलासा, म्हणाले – ‘…तर 6 फुटांचे अंतरही सुरक्षित नाही; कोरोना हवेतून पसरतो’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान कोरोना हा आजार हवेतून पसरतो की नाही यावर मतमतांतरे असताना अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शनने मोठा खुलासा केला आहे. कोरोना हा हवेतून एकाकडून दुसऱ्याला संक्रमित होतो. श्वास सोडताना नाकावाटे किंवा तोंडावाटे निघणाऱ्या अतिसूक्ष्म कणांद्वारे तो हवेतून पसरण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. सीडीसीने 6 फुटांचे अंतरही सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे. जर कोरोनाबाधित रुग्ण 15 मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त काळ एखाद्या घरात किंवा खोलीत असेल तर त्याच्या श्वासातून बाहेर पडलेला कोरोना व्हायरस हवेतच राहतो आणि अशा परिस्थितीत 6 फुटांपेक्षा जास्त अंतर असलेल्या व्यक्तीलाही कोरोनाची बाधा होते. अन्य खुल्या जागांवर 6 फुटांचे अंतर सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.

CDC ने अमेरिकेमध्ये नागरिकांसाठी नवीन गाईडलाईन जारी केली आहे. यात त्यांनी कोरोनाचा SARS-CoV-2 हा व्हायरस श्वासाद्वारे निघणाऱ्या द्रव्य कणांद्वारे पसरतो. अनेकवेळा बोलत असताना लोकांच्या तोंडातून थुंकीचे थेंब किंवा छोटे छोटे कण बाहेर पडतात. हे कण आजुबाजुच्या जागेवर पडतात किंवा हवेमध्ये तरंगत असतात. मोठे थेंब असतील तर ते काही सेकंदांत किंवा काही मिनिटांत जमिनीवर अथवा अन्य पृष्ठभागावर पडत असतात. मात्र, खूप छोटे कण असतात ते काही मिनिटे ते काही तास हवेतच राहतात असे म्हटले आहे. लॅन्सेट जर्नलमध्ये एक संशोधन प्रसिद्ध झाल्यानंतर साधारण महिनाभराने सीडीसीच्या या नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत. लॅन्सेटमध्ये कोरोना व्हायरस हवेतून पसरत असल्याचे म्हटले होते. कोरोना हवेतून पसरत असल्याचे अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडाच्या सहा शास्त्रज्ञांनी जाहीर केले आहे. तर हा आजार हवेतून पसरत नसल्याचे 100 शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

… तर काय करावे लागेल
कोरोना हवेतून पसरत असल्यास प्रतिबंधात्कम नियमात बदल करण्याची गरज आहे. आपल्याला चांगल्या मास्कची गरज भासेल. शारीरिक अंतर देखील वाढवावे लागणार आहे. निर्जंतुकीकरण योग्य पद्धतीने करण्याची गरज आहे. कोरोना हवेतून पसरत नसल्याचा ठोस पुरावा नाही. हा आजार सध्या वेगात पसरत आहे. वैज्ञानिकांनी मानव व जनावरांवर विविध प्रयोग केले आहेत. हा विषाणू हवेत 3 तास थांबतो. त्यामुळे हवेतून कोरोना संक्रमण होऊ शकते, असे नागपूर येथील डॉ. अशोक अरबट यांनी म्हटले आहे.