जम्मू काश्मीर : CRPF च्या ताफ्याजवळ कारचा भीषण स्फोट ; स्फोटानंतर कारचालक गायब

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील बनिहाल जवळ जम्मू- श्रीनगर महामार्गावर एका कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, कारमध्ये स्फोट झाला तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा तेथून जात होता. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे एका सँट्रो कारमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. ज्यावेळी कारमध्ये स्फोट झाला तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा तेथून जात होता. ज्या कारमध्ये हा स्फोट झाला आहे; त्या कारचा चालक गायब झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे. या स्फोटात कोणीही जखमी किंवा जीवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र या स्फोटामुळे सीआरपीएफच्या एका वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे.

या स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे तेथे नाकाबंदी केली आहे.