मंगळुर विमानतळावर बॉम्ब ठेवणाऱ्याची पोलिसांसमोर शरणागती

बंगळुरु : पोलीसनामा ऑनलाइन – मंगळुर विमानतळावर बॉम्ब ठेवणाऱ्या आदित्य राव याने बुधवारी सकाळी बंगळुरु शहरातील हळसुरु पोलीस ठाण्यातील पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. राव याची मानसिकता अस्थिर असल्याचे दिसत असून त्याचा दावा पडताळून पाहिला जात आहे. याबाबत मंगळुरु शहर पोलीस आयुक्त हर्ष यांनी सांगितले की, पोलीस अधिकाऱ्यांचे एक पथक लवकरच या प्रकरणासंदर्भात शोध घेण्यासाठी बंगळुरुला रवाना होईल. संशयिताकडे चौकशी केल्यानंतर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

मंगळुर विमानतळावर सोमवारी एक संशयास्पद दिसणारी बॅग पडलेली आढळून आली होती. विमानतळावरील तिकीट काऊंटरजवळील प्रवाशांसाठीच्या बॅगाच्या भागात ही बॅग होती. बेवारसी बॅग पाहून पोलीस व विमानतळ सुरक्षा रक्षकांनी तातडीने बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण केले. तो संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. त्यानंतर त्या बॅगेची तपासणी केली असताना त्यात स्फोटक पदार्थ (आयईडी) असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर ही बॅग सुरक्षितस्थळी नेऊन त्यातील स्फोटकांचा नाश करण्यात आला होता.

या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासात सीसीटीव्हीनुसार बॅग ऑटो रिक्षात ठेवत असलेल्या संशयिताचा फोटो व रिक्षा मिळाली आहे. मंगळुर पोलिसांनी त्यांचे फोटो जारी केले आहेत. असे असताना आता आदित्य राव असे नाव सांगणाऱ्याने ही बॅग ठेवल्याचा दावा केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –