ऐन लग्नात नवरदेव झिंगाट ; मुलीने उचलले पुढचे पाऊल

गाजियाबाद : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये एखाद्या चित्रपटाला कथेला शोभावा असा विवाह सोहळा पार पडला. दारूच्या नशेत असणाऱ्या नवरदेवाला नकार देत वधूने वरात पुन्हा पाठवून दिली आणि लग्नात आलेल्या एका तरुणाने तरुणीशी लग्न करण्याची तयारी दर्शवली.

बुधवारी ट्रॉनिका सिटी येथील कॉलनीत दिल्लीच्या रोहिणी परिसरातून वरात येणार होती. घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. नवरीमुलीच्या कुटुंबीयांनी अगदी थाटामाटात नवरदेव आणि वरातीचं स्वागत केलं. पण नवरदेव स्टेजवर पोहोचताच चित्र बदललं. लग्नाच्या वेळी नवरा मुलगा दारू पिऊन तर्राट होता. त्याला नीटपणे उभं देखील राहता येत नव्हतं. हे लक्षात येताच नवरी संतापली आणि तिने हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. तिच्या कुटुंबीयांनीही तिला समर्थन दिलं.

मात्र यामुळे मुलीचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले होते. त्यामुळे आता मुलीशी लग्न करणार कोण? आई-वडील, घरच्यांमध्ये यावर विचार सुरू होता. यावेळी लग्नात आलेल्या एका तरुणाने आपण लग्न करण्यास तयार असल्याचं मुलीच्या वडिलांना सांगितलं. यावेळी चर्चा करुन सर्वांनी होकार दिला आणि त्याच मांडवात विवाह सोहळा पार पडला.