मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, 7 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

छत्तीसगड : पोलीसनामा ऑनलाइन –    छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एका बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बसमधील 7 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गंजम येथून मजुरांसह गुजरातमधील सुरतकडे ही बस निघाली होती. हा अपघात रायपूरच्या चेरी खेडी येथे आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास झाला आहे.

रायपूरचे पोलीस अधीक्षक अजय यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ओडिशामधील गंजम येथून सुरतकडे जात होती. याच दरम्यान रायपूरच्या चेरी खेडी येथे ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. यात सात जणांचा मृत्यू झाला. तर इतर मजूर जखमी झाले आहेत. जखमी मजूरांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, बस दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 7 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये अनुदान देण्याची घोषणा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी केली आहे. तर जखमींना तातडीने मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी घटनास्थळावरून 7 जणांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. हे सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप समजू शकले नाही.