राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यासह 100 जणांवर FIR

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती असून सरकारने नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, लोकप्रतिनिधीनांच त्याचं गाभीर्य नाही का, असा प्रश्न निर्माण करणारी घटना पाथरी येथे घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्रानी आणि 100 जणांविरुद्ध अधिक जणांविरोधात पाथरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात जमावबंदीचे आदेश मोडून एकत्रित नमाज पठण केल्याबद्दल पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

आज मुस्लीम बांधवांचा पवित्र ईद हा सण साजरा करण्यात आला. या सणानिमित्त नमाज पठण केले जाते. पण कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुले राज्यभरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वजनिक ठिकाणी नमाज पठण करू नये, असे आदेश काढण्यात आले होते. तसेच सामूहिक नमाज पठणावर यावर्षी बंदी आणण्यात आली होती. पण विधिमंडळाचे सदस्य असलेल्या बाबाजानी दुर्रानी यांनीच कायदा मोडत एकत्र नमाज पठण करण्याचे कृत्य केलं. आज पाथरीमध्ये 100 अधिक लोकांना जमा करत त्यांनी नमाज पठण केल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.

पाथरी पोलिसांनी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यासह 100 हून अधिक लोकांच्या विरोधात जमावबंदी आणि जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे विधानपरिषद सदस्य असलेल्या दुर्रानी हे कायदे बनवणाऱ्या विधिमंडळाचे सदस्य आहेत. कायदा तयार करणाऱ्या सभागृहाच्या सदस्यानेच सरकारने केलेला कायदा मोडल्याने लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.