Pune News : ‘तू काय माझ्याकडे बघतो, तुला माज आला का, मी कोण आहे माहित आहे का ?’; तुला पण केक सारखा कापून टाकीन, मारणे गँगच्या रूपेश मारणेसह 8 जणांविरूध्द गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कूविख्यात गुन्हेगार गजा मारणेच्या टोळीतील सराईत गुन्हेगार रुपेश मारणे आणि इतर 8 जणांवर आज (मंगळवार) पुणे पोलिसांनी धमकावणे व सार्वजनिक रस्त्यावर केक कापल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रास्ता पेठेत 14 फेब्रुवारीच्या रात्री हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात रुपेश मारणे व त्याच्या 8 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, समर्थ पोलिस ठाण्यातील बीट मार्शल सचिन जाधव व बालाजी शिंदे हे 14 फेब्रुवारीच्या रात्री रात्र गस्तीवर होते. ते रास्ता पेठेतील इंग्लिश मीडियम स्कूल जवळून जात असताना घाबरलेल्या अवस्थेत एक तरुण आला. त्याने मार्शलच्या कर्मचार्‍यांना रुपेश मारणे हा तेेथे साथीदारासोबत रस्त्यावर केक कापत असल्याची माहिती दिली. तसेच, तू काय माझ्याकडे बघतो, तुला माज आला का, मी कोण आहे माहित आहे का, मी रुपेशदादा मारणे असून, पुण्याचा भाई आहे. आताच जेलमधून सुटून आलो आहे. तुला पण केक सारखा कापून टाकीन असा दम दिल्याचे सांगितले.

यावेळी येथे कर्मचारी सुमीत खुट्टे सुभाष मोरे हे देखील तिथे आले होते. मग या कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. तर मारणे हा त्याच्या साथीदारासोबत केक कापत होता. पण, पोलिसांना पाहून या सर्वांनी येथून पळ काढला. त्यांचा पाठलागही केला परंतु हे सर्व पळून जाण्यात यशस्वी ठरले. काही वेळ शोध घेतला. पण कोणीच सापडले नाही.

यानंतर एका अज्ञात व्यक्तीने दिलेल्या माहितीवरून गुंड रुपेश मारणे व त्याच्या साथीदारांविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात सार्वजनिक जागेत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून, बेकायदेशीर गर्दी जमवून वाढदिवसाचा केक कापलयाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे या गुन्ह्याचा तपास करत आहे