‘छोटे सरदार’च्या नृत्याने मेलानिया ट्रम्प यांचे वेधून घेतले ‘लक्ष’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेची फस्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी आज (मंगळवार) राजधानी दिल्लीतील मोती बाग येथील एका सरकारी शाळेतील हॅपीनेस क्लासला बघण्यासाठी आल्या होत्या. मेलानिया यांच्या स्वागतासाठी शाळेमध्ये नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान एका छोट्या सरदरजींनी मेलानिया यांचे लक्ष वेधून घेतले. झाले असे की मेलानिया यांच्या स्वागतासाठी ठेवलेल्या नृत्याच्या कार्यक्रमामध्ये काही मुलांनी स्टेजवर भांगडा नृत्य सादर केले. भांगडा नृत्य सुरु असताना या छोट्या सरदारजीला मोह आवरला नाही. त्याने आपल्या जागेवर उभारून तिथेच डान्स करण्यास सुरुवात केली.

याच दरम्यान ही बाब या ठिकाणी हजर असलेल्या व्यक्तीच्या लक्षात आली. त्यांचे लक्ष लहान सरदारजीकडे गेले. ही व्यक्ती मुलाचा डान्स बघत असताना मेलानिया यांचे देखील त्या मुलाकडे लक्ष गेले. त्यांनी स्टेजवरील डान्स संपेपर्यंत या छोट्या सरदारजीचा भांगडा पाहिला आणि त्याला प्रोत्साहन दिले. या छोट्या सरदारजीचा डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तर त्याच्या नृत्याचे शाळेतील शिक्षकांनी देखील कौतुक केले आहे.

अमेरिकेची फस्ट लेडी मेलानिया ट्रम्प शाळेला भेट देणार असल्याने शाळेला फुलांनी सजवण्यात आले होते. मेलानिया यांच्या स्वागतासाठी शाळेतील लहान मुले पारंपारीक वेषभूषा करून आले होते. मेलानिया यांचे लहान मुलांनी गळ्यात हार घालून स्वागत केले. तसेच त्यांच्या कपाळावर टिळा लावला. या पार्श्वभूमीवर शाळेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मेलानिया यांच्या या दौऱ्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आनंद व्यक्त केला आहे.