मावशीचं प्रेम मिळवण्यासाठी मुलाचे अपहरण करणारा आरोपी 24 तासांत पोलिसांच्या ताब्यात 

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाईन – मुलाच्या मावशीचं प्रेम मिळवण्यसाठी एका 20 वर्षीय तरुणाने तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण केले. परंतु उल्हासनगर क्राइम ब्रांचने अपहरण झालेल्या त्या तीन वर्षाच्या मुलाची 24 तासांत सुटका केली आहे. सदर आरोपी हा मुळचा अलाहाबादचा असून त्याला ठाणे रेल्वे स्थानकावरुन आरोपी सुरज सिंह, दारा सिंहला अटक करण्यात आली. मुलाच्या मावशीचं प्रेम मिळवण्यसाठी त्याने हे अपहरण केलं होतं. पण अखेर तो पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.

सदर अपहरणाची घटना गुरुवारी संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास घडली आहे. यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करत हे प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आलं होतं. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ज्या दिवशी मुलाचं अपहरण झालं होतं त्या दिवशी आरोपी सकाळी विठ्ठलवाडीत तिला भेटण्यासाठी आला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

आरोपी त्या मुलाचं अपहरण करून त्याला विक्रोळीतील मित्राच्या घरी ठेवलं. त्यानंतर त्याने मुलाच्या मावशी फोन केला आणि भेटायला येण्यास सांगितले. इतकेच नाही तर, येताना मावशीने एकटेच यावे असेही त्यांनी म्हटले. जर त्याची ही मागणी मान्य केली नाही तर मुलाची हत्या करू अशी धमकीही त्याने तिला दिली होती. यानंतर मावशीने तात्कळा पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी सापळा रचला. पण तोपर्यंत त्याने कुर्लाहून विक्रोळीला आणि तेथून ठाण्याला पळ काढला. पोलिसांनी शक्कल लढवत मावशीला ठाणे रेल्वे स्थानकावर पाठवलं. आरोपी तिला भेटायला तिथे दाखल झाला. आरोपी तिच्या जवळ येताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. यानंतर त्या मुलाला ताबडतोब पालकांकडे सोपवण्यात आले. उल्हासनगर क्राइम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मुलाची मावशी आधी सुरतमध्ये राहत होती. आरोपी हा तिच्या शेजारीच वास्तव्यास होता. सदर आरोपी हा महिलेच्या प्रेमात होता. परंतु सदर महिलेला ते मान्य नव्हते. ती नेहमीच त्याकडे दुर्लक्ष करत आली. परंतु त्याच्याकडून होणारा त्रास वाढतच गेला. शेवटी कंटाळून या महिलेने राहते घर सोडले आणि हिणीच्या घरी विठ्ठलवाडीत येऊन राहण्यास सुरुवात केली होती. परंतु यानंतर आरोपीने तिचा पाठलाग करत आणखी त्रास देण्यास सुरुवात केली. यानंतर आरोपीने मुलाचं अपहरण केलं आणि तिला भेटण्यासाठी गळ घातली. परंतु पोलिसांच्या कामगिरीने 24 तासांच्या आतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या.