कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास अंतिम टप्प्यात

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइन – कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणाची सध्याची महत्वपूर्ण माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली आहे. या हत्येमधील संशयितांचे बेळगाव ते जळगावपर्यंतचे कनेक्शन उघड होत आहे. तपास अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी युक्तिवादावेळी दिली आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट बेळगावात रचला. कोल्हापुरात त्यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर पिस्तूल नष्ट करण्यासाठी टेंबलाईवाडी टेकडीवर कटातील सहभागींची भेट झाली. तेथून पिस्तूल आणि हत्येवेळी वापरलेली दुचाकी नष्ट करण्याचे ठरले. यात या प्रकरणातील सहावा संशयित वासुदेव भगवान सूर्यवंशी (२९ रा. साखळी, ता. यावल. जि. जळगाव) आणि भारत उर्फ भरत जयवंत कुरणे (३७, रा. धर्मवीर संभाजी गल्ली, महाद्वार रोड, बेळगाव) यांचा महत्त्वाचा सहभाग होता, असे जळगाव व बेळगाव कनेक्शनही तपासात उघड झाले आहे.

राणे यांनी युक्तिवादात सांगितले की, पानसरे हत्या प्रकरणात वीरेंद्रसिंह तावडे क्रमांक दोनचा संशयित आहे. त्याने बेळगांव जिल्ह्यात बॉम्बस्फोटाचे प्रशिक्षण आयोजित केले होते. तावडेच्या सांगण्यावरुनच सूर्यवंशी बेळगांवात आला होता. कुरणे त्यापूर्वीच बैठकीला उपस्थित होता. त्याच्यासोबत आठ ते नऊ साथीदार होते. याच बैठकीत पानसरे हत्येचा कट शिजला. हत्येसाठी मोटारसायकल चोरुन आणण्याची जबाबदारी सूर्यवंशीवर सोपवली. त्याने ती बेळगावरुन चोरून आणली. कोल्हापुरात तावडे हॉटेल परिसरात गाडी लावल्याचे ठिकाणही त्याने दाखिवले आहे.

हत्येसाठी पाच ते सहा मोटारसायकल वापरण्यात आल्या. पानसरेंवर गोळ्या झाडल्यानंतर काही मिनिटांतच मास्टंर माइंड वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे, कुरणे आणि त्याचा साथीदार टेंबलाई टेकडीवर भेटले. तावडेने गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल नष्ट करण्यासाठी कुरणेकडे दिले. तो पिस्तूल घेऊन हायवेवरुन न जाता गडहिंग्लजमार्गे बेळगावला गेला. त्या वेळी गडहिंग्जलज परिसरातील एका पोलिस पाटलला या दोघांचा संशय आला. त्याने दोघांकडे विचारणा केली. मात्र तेथून हे दोघे स्थानिक परिसरातील ओळख सांगून निघून गेले. अमोल काळेने मे २०१५ मध्ये कुरणेला दूरध्वनी करुन बेळगाव जिल्ह्यातील एका रिसॉर्टवर भेटण्यासाठी बोलाविले होते. पानसरे याच्या हत्येविषयी अधिक चर्चा करू नये, असा दमही त्याला दिला. या रिसॉर्टवर फरार असलेले संशयित विनय पवार आणि सारंग अकोलकर उपस्थित असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे.
गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल बेळगावातून आणली आहे. सूर्यवंशी मेकॅनिक असल्याने चोरून आणलेल्या वाहनांचा गुन्ह्यात वापर केल्याची शक्यता आहे. तो मूळचा जळगावचा आहे. तपास करण्यासाठी कोल्हापूर एसआयटी बेळगाव आणि जळगावला जाणार आहे. तपासाचा अहवाल १४ डिसेंबरला हायकोर्टासमोर सादर केला जाणार आहे.

डॉ. पोळ पिस्तूलप्रकरण : कारागृहातील १४ कर्मचारी निलंबित