दहावीचा पेपर फोडणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात दहावीची परिक्षा सुरु आहे. पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर होता. परिक्षा सुरु झाल्यानंतर काही वेळाचत मराठीचा पेपर फुटला. पेपर फोडणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील शिक्षकावर धारुर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत शिक्षकाला निलंबीत करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे यांनी दिले आहेत.

पांडुरंग गणपत मेकुंडे (रा. मोरेवाडी, ता. अंबाजोगाई) असे पेपर फोडणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. या प्रकरणात अंबाजोगाईचे गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पांडुरंग मेकुंडे विरोधात धारुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेकुंडे भावठाना येथील साने गुरूजी विद्यालयात सहशिक्षक आहे. शुक्रवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. या परीक्षेसाठी आडस येथील केंद्रावर मेकुंडेची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परीक्षा सुरु झाल्यापासून अवघ्या दिड तासात मेकुंडे याने मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फोडून ती ‘जिजामाता अंबाजोगाई टीचर्स’ या शिक्षकांच्या ग्रुपवर टाकली.

ग्रुपवर प्रश्नपत्रिका पाहताच अनेक शिक्षकांनी याचा निषेध केला. विशेष म्हणजे अंबाजोगाईचे गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे देखील या ग्रुपचे सदस्य आहेत. शिंदे यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती वरिष्ठांना कळविली. बोर्डालाही हा प्रकार कळवण्यात आला होता. दरम्यान, या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली. शनिवारी रात्री उशीरा या प्रकरणात पांडुरंग मेकुंडे विरोधात धारुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे यांनी मेकुंडे याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश शाळेच्या संस्थाचालकास दिले आहेत. मेकुंडे याच्या निलंबनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर संस्थाचालकानी तातडीची बैठक बोलावली. बैठकीत ठरल्यानुसार मेकुंडे याला आपले म्हणणे मांडण्यासाठी २४ तासांचा अवधी देण्यात आला आहे. त्यांनतर आज (रविवारी) सायंकाळी बैठक होऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.