‘त्या’ पोलिसाच्या कुटुंबियांचा सामुहिक आत्मदहनाचा इशारा

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस कॉन्स्टेबल राहूल जगताप याने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आणि पोलीस नाईक आरकिले या दोघांच्या त्रासाला कंटाळूनच विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा तात्काळ दाखल करावा. त्यांच्यावर कडक कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा पोलीस ठाण्यासमोर आम्ही सहकुटूंब आत्मदहन करू, असा इशारा राहूल याचे वडील आणि पत्नीने दिला आहे. जगताप याच्या कुटुंबियांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे सोलापूर पोलीस दलात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

राहूल शिवाजी जगताप (२८) या पोलीस कॉन्स्टेबलने पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस नाईक त्रास देत असल्याने आत्महत्या करीत असल्याची खळबळजनक पोस्ट सोशल मिडीयावर टाकली होती. ही पोस्ट व्हायरल करून बेपत्ता झालेला  राहूल जगताप हा शनिवारी सायंकाळी भाळवणी येथे अत्यवस्थेत सापडला होता. रोगर नावाचे विषारी औषध पिऊन त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यामुळे त्याची प्रकृती अजूनही गंभीर असून त्याच्यावर येथील लाईफलाईन रूग्णालयात अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकाराबाबत राहूल याचे वडील शिवाजी जगताप यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आत्महत्येचा इशारा देऊन बेपत्ता झालेल्या राहूल याचा दोन दिवसात पोलिसांनी कसलाही शोध घेतला नाही. साधी चौकशीही कोणाकडे केली नाही. वेळीच तो सापडला असता तर ही वेळ आली नसती, असा गंभीर आरोप करून ते म्हणाले, पोलीस निरीक्षक जाधव आणि पोलीस नाईक आरकिले हे दोघे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून आपल्याला वारंवार त्रास देतात, असे राहूल जगताप घरी नेहमी सांगत असे. तरीही वरिष्ठ आहेत, तूच समजून घे, असे आम्ही त्यास सांगत होतो. अखेर या त्रासाला कंटाळूनच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास आम्ही काय करायचे? त्यामुळे जाधव व आरकिले यांच्यावर त्वरीत गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी. आम्हाला न्याय न मिळाल्यास, पोलीस ठाण्यासमोर आम्ही सहकुटूंब आत्मदहन करू., असा इशारा राहूल जगतापच्या वडीलांनी दिला आहे.

यावेळी पोलीस कॉन्स्टेबल राहूल जगतापच्या पत्नीनेही पोलीस निरीक्षक जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले. खोट्या डायरी आणि हजेरीसाठी जाधव हे नेहमी आपल्या पतीला त्रास देत होते. त्यामुळे आपण गरोदर असताना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठीही पती कधी वेळ देऊ शकले नाहीत. त्यामुळे घरी पोलीस निरीक्षक जाधव यांचा विषय निघायचा. आमचे मुल आज अवघ्या दोन महिन्यांचे आहे. आमच्यावर काय वेळ आली आहे, हे आम्हालाच माहित आहे. आता तरी जाधव यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.