धक्कादायक ! कचरा पेटीजवळ मोठा दगड अन् तरूणाची ‘डेडबॉडी’, नागपूर शहरात खळबळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  उपराजधानीत केव्हा काय घडेल याचे सोयरसुतक नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरुन एकमेकांच्या वैरत्वाचे भाव येथे प्रकट होताना दिसतात. दरम्यान, शनिवारी (दि. १८) सकाळी मनकापूर परिसरात एका अज्ञात युवकाचा आरोपींनी दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मनकापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला आहे.

मनकापूर क्रीडा संकुलाच्या मागे असलेल्या कचरा कुंडीजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या मृतदेहा शेजारी भलामोठा दगड रक्ताने माखलेला आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे.

या तरुणाची अद्याप ओळख पटली नाही. या तरुणाची का आणि कशासाठी हत्या करण्यात आली, पोलीस याबाबत तपास करत आहे. शहरात दोन दिवसातील दुसरी हत्या आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

९ महिन्यांच्या मुलीची पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून हत्या

एका युवकाने दोन दिवसांपूर्वीच आपल्या ९ महिन्याच्या चिमुकलीला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून तिची हत्या केल्यानंतर स्वतःचा गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. नागपूरच्या भांडेप्लॉट चौकातील शंकर शाही मठाजवळ गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

सोनू इसराईल शेख (वय ३२) हा शंकर शाही मठाजवळ राहतो. त्याचे तीन भावांचे संयुक्त कुटुंब आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी बियरची फुटलेली बॉटल जप्त केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.