AIIMS च्या सुरक्षा कर्मचार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी AAP चे आमदार सोमनाथ भारती दोषी

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे ( Aam Aadmi Party ) वादग्रस्त आमदार सोमनाथ भारती यांना एम्सच्या सुरक्षा कर्मचार्‍याला मारहाण केल्याबद्दल दिल्ली न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याच प्रकरणातील अन्य चार आरोपींना न्यायालयाने निर्दोष सोडले आहे. एम्स येथील सुरक्षा कर्मचार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी २०१६ मध्ये सोमनाथ भारती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सोमनाथ भारती यांनी वकील म्हणून दिल्ली उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात काम केले आहे. दिल्ली विधानसभेच्या २०१३ मधील निवडणुकीत ते आपकडून मालवीय नगर मतदारसंघातून निवडून आले आहे. ते अरविंद केजरीवाल सरकारमध्ये कायदा, पर्यटन, प्रशासकीय सुधारणा, कला आणि सांस्कृतिक मंत्री होते. २०२० च्या दिल्ली निवडणुक त्यांनी १८१४४ मतांनी जिंकली होती.

सोमनाथ भारती हे कायम वादग्रस्त राहिले आहेत. त्याच्यावर ड्रग्ज आणि वेश्या व्यवसायाबाबतही आरोप करण्यात आले होते. कौटुंबीय छळाबाबत त्यांच्या पत्नीने त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. उत्तर प्रदेश सरकार आणि हॉस्पिटलविषयी अक्षेपार्ह विधान केल्याबद्दल त्यांना नुकतीच उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली होती.