मुख्यमंत्र्यांना डावलून शिवसेना करणार सागरी मार्गाचे भूमिपूजन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील सागरी किनारा मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेने जाणिवपूर्वक निमंत्रित केलेले नाही. या प्रकारामुळे भाजपमध्ये तीव्र नाराजी असून या मानपानावरून दोन्ही पक्षातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. कल्याण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा होत असून या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपने बोलावले नाही. उद्धव ठाकरे यांना डावलण्यात आल्याचा हा वचपा शिवसेनेने सागरी किनारा मार्गाच्या भूमिपूजन सोहळ्यात काढला आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी, तसेच वाहतुकीला गती देण्यासाठी नरिमन पॉइंट ते कांदिवलीदरम्यान मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी येथील सागरी सेतूदरम्यान सागरी किनारा मार्ग उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील प्रकल्प उभारणीची जबाबदारी पालिकेवरच सोपविण्यात आली आहे. या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा आज अमरसन्स उद्यान, कंबाला हिल, वरळी येथे दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला असून उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.

तर १८ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन कल्याण येथे करण्यात येणार असून, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजी पसरली आहे. त्याचे उट्टे काढत शिवसेनेने सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा सोहळा घाईघाईने ठरवून मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलेले नाही. सागरी किनारा मार्ग प्रकल्प उद्धव ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असला तरी त्यासाठी आवश्यक असलेल्या केंद्र सरकारच्या १९ परवानग्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी जातीने लक्ष घालून पंतप्रधान मोदी यांच्याकडे पाठपुरावा करून मिळवून दिल्या आहेत. तरीही भूमिपूजन सोहळ्यापासून मुख्यमंत्र्यांनाच दूर ठेवल्यामुळे भाजपमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा भाजपसाठी महत्त्वाचा असल्याने सध्या मूग गिळून गप्प राहण्याची सूचना वरिष्ठ नेत्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.