औरंगाबादमध्ये मित्राला वाचवण्यास गेलेल्याचा बुडून मृत्यू !

पोलिसनामा ऑनलाईन – चौका घाटातील तलावामध्ये नौकाविहार करत असताना अचानक बोट उलटली. त्यामुळे पाण्यात बुडणार्‍या मित्राला वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या मित्राचाही पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला आहे. त्यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. फुलंब्री तालुक्यातील चौका घाटातील तलावात रविवारी दुपारी 3 वाजता ही घटना घडली.

निशांत चंद्रमोरे (वय 35, रा. सूतगिरणी) आणि अभिजात कुरेकर (वय 37 रा.सिडको) अशी बुडून मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

दोघेही कुटुंबीयांसह चौका घाटातील रिसॉर्टवर पोहोचले होते. रिसॉर्टचे मालक निशांत चंद्रमोरे त्याचे पाच मित्र आणि कुटुंबीयांसोबत रविवारची सुट्टी घालवण्यासाठी आले होते. रिसॉर्टला लागून असलेल्या तलावात निशांत चंद्रमोरे होडीने नौकाविहार करत होता. तर अभिजात कुरेकर हा दूर होडीच्या काही अंतरावर पोहत होता. अचानक होडी उलटल्यामुळे निशांत पाण्यात बुडाला. हे पाहून अभिजातने निशांतला वाचवण्यासाठी पोहोचला. पण, यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. काही तासात निशांतचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर अभिजातचा मृतदेह आज सकाळी काढण्यात आला. अभिजात कुरेकर हा वास्तूविशारद होता. त्याचबरोबर तो एक उत्तम बाईक रायडर सुद्धा होता. अभिजात आणि निशांत यांच्या मृत्यूमुळे दोन्ही कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.