मध्यरात्री रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या माजी नगरसेवकासह कार्यकर्त्यांवर गुन्हा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने बेकायदेशीर जमाव जमवून, मध्यरात्री रस्त्यावर फटाके फोडणाऱ्या माजी नगरसेवकासह त्यांच्या १० ते १५ कार्यकर्त्यांवर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार प्रथम सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास घडला.

माजी नगरसेवक धनराज चरणदास बिर्दा (रा. प्रथम सोसायटी, वाकड, पुणे) व इतर १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक पी. ए. करे यांनी फिर्याद दिली आहे.

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी जमावबंदी आदेश जारी केलेला आहे. या आदेशाचे उल्लंघन करुन माजी नगसेवक बिर्दा यांच्या वाढदिवसानिमित्त बेकायदेशीर जमाव जमवून मोठमोठ्याने फटाके वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग केला. बिर्दा हे भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष आहेत. तपास वाकड पोलीस करत आहेत.