Pimpri News : वाकड येथील पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीतील टोळीला अटक

पिपंरी (Pimpri) : वाकड (Wakad) येथील पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील ५ जणांना वाकड (Wakad) पोलिसांनी अटक केली आहे. तुषार आनंद भरोसे (वय २२, रा. वारजे), सिद्धार्थ अनंत भगत (वय २१, रा. निंबाळकरवाडा, नवी पेठ), प्रेमशितल जानराव (वय १९, रा. संभाजी पोलीस चौकीजवळ, जोशीवाडा), स्वप्नील नागनाथ चंदनशिवे (वय २२, रा. रहाटणी), श्रीपाद ऊर्फ ओक्या मारुती कामत (वय १८, रा. भारतनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस नाईक एस एस नरुटे यांनी वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हे सर्व आरोपी थेरगाव येथील डांगे चौकातील रिजन्ट हॉटेलजवळ रविवारी दुपारी एकत्र आले होते. पोलिसांना याविषयी माहिती मिळाल्यावर त्यांनी सापळा रचून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे लोखंडी पालघन, कुकरी, कोयता, रस्सी, लोखंडी टॉमी व मिरची पुड असे दरोड्याचे साहित्य मिळून आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता वाकड येथील सेल पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी ते जमले असल्याची त्यांनी कबुली दिली. सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पवार अधिक तपास करीत आहेत.