धक्कादायक… मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – मानसिक संतुलन बिघडलेल्या एका १८ वर्षांच्या तरुणीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा येथे घडली आहे. तरूणीच्या मानसिक स्थितीमुळे पोलिसांच्या तपासात अनेक अडचणी येत आहेत. या तरुणीला नेमके घटनास्थळ सांगता आलेले नाही. अद्याप एकही नराधम पोलिसांच्या हाती लागलेला नसून, तपास करायचा कसा, अशा विवंचनेत पोलीस पडले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नालासोपारा येथे राहणारी १८ वर्षीय मनस्वी (बदललेले नाव) हिचे बहिणीसोबत १० ऑक्टोबरला सायंकाळी भांडण झाले होते. मानसिक संतुलन बिघडलेली मनस्वी घरातून निघाली ती दुसऱ्या दिवशी ११ ऑक्टोबरला घरी परतली. यावेळी तिची प्रकृती खालावलेली होती. बहिणीने विचारले असता पोटात खूप दुखत असल्याचे तिने सांगितले. वडिलांनी आणि बहिणीने मनस्वीला डॉक्टरकडे नेले असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले. याबाबत स्वीटीला विचारल्यानंतर तिघांनी आपल्यावर जबरदस्ती केल्याचे तिने सांगितले. या प्रकारामुळे तिच्या कुटुंबियांना जबदस्त मानसिक धक्का बसला. तिच्या वडिलांनी नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार केली. मनस्वीने त्या रात्री वांद्रे येथे गेल्याचे पोलिस चौकशीदरम्यान सांगितले. मनस्वीचे कुटुंब काही वर्षांपूर्वी वांद्रे येथील निर्मलनगरमध्ये राहत होते. त्यामुळे तुळींज पोलिसांनी हा गुन्हा निर्मलनगर पोलिसांकडे वर्ग केला.

भाजप नगरसेवकाने महिला अधिकाऱ्यास पाठविले अश्लील संदेश, नगरसेवक फरार

मनस्वीकडे सापडलेल्या कागदाच्या तुकड्यावर एक मोबाइल नंबर लिहिण्यात आला होता. हा नंबर वांद्रे येथे राहणाऱ्या राहुल मिश्रा याचा असून तो मनस्वीसोबत शाळेत शिकत होता, अशी माहिती तिच्या बहिणीने दिली. निर्मलनगर पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता मोबाइल नंबरसाठी देण्यात आलेला पत्ता हा ताडदेव येथील असून, मोबाइल धारकाचे नाव राहुल नव्हे तर मनोज साहा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हा गुन्हा ताडदेव पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

मनस्वीचे मानसिक संतुलन ठीक नसल्याने तिला घटनास्थळ सांगता येत नाही. ताडदेव पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी ती समुद्र आणि जुहू असे बोलत होती. त्यामुळे ताडदेव पोलिसांनी तिला हाजीअली समुद्राजवळ नेले. पण, तरीही काही धागेदोरे मिळाले नाहीत. मुख्य आरोपीचा मोबाइल नंबर हा एकमेव धागा सध्या पोलिसांकडे आहे. मात्र, घटना घडल्यापासून तो मोबाइल नंबर बंद आहे. पोलिसांचे पथक बिहारपर्यंत जाऊन आले पण हाती काहीच लागलेले नाही. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी परदेशात पळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.