औरंगाबाद दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करणार : गृहराज्यमंत्री पाटील

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन

औरंगाबादमध्ये शुक्रवारी (दि.११) रात्री अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या वादातून दोन गट आपापसात भिडले. याचे पर्यवसन दंगलीत झाले. दोन्ही गटांनी तलवारी, चाकू, लाठ्या-काठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक केली. या घटनेत पोलीस, नागरिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. पालकमंत्री डॉ. दिपक सावंत, गृहराज्यमंत्री रजणजीत पाटील यांनी आज (शनिवारी) दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचे रणजीत पाटील यांनी सांगितले.

पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांनी शहरातील राजाबाजार, शहागंज, गांधीनगर, कुआरफल्ली, संस्थान गणपती, चेलीपुरा भागाची पाहणी केली. दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. चौकशी समितीमध्ये कोण असणार याविषयाचा निर्णय रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल. तसेच दंगलीतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.

दंगलग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर रणजीत पाटील म्हणाले, एकाच वेळी चार-पाच ठिकाणी जाळपोळ,दगडफेकीच्या घटना घडत होत्या. यामुळे पोलिसांना सर्वच ठिकाणी वेळेत पोहचता आले नाही. घडलेल्या घटना अतिशय दुर्दैवी आहेत. यात सोशल मिडियाच्या गैरवापरामुळे दंगल भडकण्यास हातभार लागला असून, सायबर सेलला याविषयी तपास करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार दंगलीची सखोल चौकशीसाठी राज्यस्तरावरील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली जाणार आहे. या चौकशीतुन सर्व सत्य बाहेर येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.