अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा खून

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – अनैतिक संबंधास विरोध करणाऱ्या पत्नीच्या आत्महत्येचा बनाव करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पती व त्याच्या प्रेयसीविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
प्रदीप विठ्ठल गाडे, बुट्टी उर्फ अलका संदिप गाडे (दोन्ही रा. मोमोन आखाडा, बारागाव नांदुर, ता. राहुरी) ही अटक केलेल्यांची नावे आहेत. ज्योती प्रदीप गाडे (वय 30) हे मयत महिलेचे नाव आहे. शनिवारी रात्री उशिरा मयत महिलेचा पती व त्याच्या प्रियसीला राहुरी पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, प्रदीप गाडे याचे अलका हिच्यासोबत अनैतिक संबंध होते. त्यासंबंधास प्रदीप याच्या पत्नीचा विरोध होता. त्यातून त्यांच्यात नेहमी वाद होत होते. बुधवारी (दि. 6) सायंकाळी पाचरट उकीरड्यावर टाकल्याचे कारण घडले. त्यातून अलका हिच्यासोबत ज्योती यांचे वाद सुरू झाले. ज्योतीचा पती व त्याची प्रेयसी अलका या दोघांनी पोटात व छातीवर बेदम मारहाण केली. या मारहाणीत ज्योती या गंभीर जखमी झाल्या. तिच्या तोंडात विषारी औषध ओतून आत्महत्या केल्याचा बनाव केला.
सदर मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर ज्योती गाडे यांचा मृत्यू विषारी औषधामुळे नव्हे, तर मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गीताराम जयवंत शेटे (रा. शेटेवस्ती, देवळी प्रवरा, ता. राहुरी) यांनी शनिवारी रात्री राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मयत विवाहितेचा पती व त्याच्या प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश शिरसाठ हे करीत आहेत.
You might also like