प्रतीक शिवशरण अपहरण व खूनप्रकरणी ग्रामस्थांचे आंदोलन

सोलापूर : पोलीसनामा आॅनलाइन – प्रतीकच्या शिवशरणच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. मंगळवेढा तालुक्यातील प्रतीक शिवशरण याचे अपहरण करून खून करण्यात आला होता. या घटनेस आता १३ दिवस उलटले तरी मारेकरी सापडलेले नाहीत. मारेकऱ्यांना अटक होण्यासाठी तसेच हा गंभीर गुन्हा नोंदविण्यास विलंब लावल्याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करावे आदी मागण्यांसाठी सात दिवसांपासून येथे आंदोलन सुरू असून पुढचा टप्पा म्हणून अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समोरासमोर, हसतमुखाने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या 

 प्रतीकचे अपहरण झाले तेव्हा तो गुन्हा दाखल करण्यास मंगळवेढा पोलिसांनी विलंब लावला, असा जनहित शेतकरी संघटनेचा आरोप आहे. प्रतीकच्या मारेकऱ्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी, संबंधित कर्तव्यचुकार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचीही खातेनिहाय चौकशी करावी, या मागण्यांसाठी  जनहित शेतकरी संघटनेने गेल्या गुरुवार, १ नोव्हेंबरपासून मंगळवेढ्यात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. या अर्धनग्न आंदोलनात जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर देशमुख यांच्यासह डॉ. बाळासाहेब सरवळे, दामाजी मोरे, अमोल माळी, येताळा खरबडे, आबा सावंजी, मधुकर कोंडुभैरी, सुखदेव डोरले, पप्पू दत्तू आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. गेले सात दिवस हे आंदोलन सुरू आहे.

भाजप नगरसेवकाने महिला अधिकाऱ्यास पाठविले अश्लील संदेश, नगरसेवक फरार

मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील प्रतीक शिवशरण या बालकाचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. पोलिसांत गुन्हा नोंद झाल्यानंतरही प्रतीकचा शोध लागला नव्हता. अखेर पाचव्या दिवशी प्रतीकचा मृतदेह माचणूरजवळ आढळून आला. त्याचे पाय तोडण्यात आले होते. डोक्यावरचे केसही कापण्यात आले होते. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार असावा, असा संशय व्यक्त होत आहे. तथापि, मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना अद्यापि यश आलेले नाही. या संवेदनशील घटनेमुळे माचणूर येथे गावकऱ्यांनी दिवाळी साजरी केली नाही. गावातील भीमनगरात शोककळा पसरलेली आहे.