पोलिसानं केलं अभिमानास्पद काम, गृहमंत्र्यांनी केलं कौतुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे सर्व कंपन्यांसह सर्व काम ठप्प आहे. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नसल्याने हे मजूर घराकडे निघाले आहेत. अशा मजुरांना रस्त्यात एकमेव आधार म्हणजे रस्त्यावरती गस्त घालणारे पोलीस. ते दिवसरात्र जनेतची सुरक्षा देखील करतात आणि मानवतेच्या भूमिकेतून हे पोलीस नागरिकांची अनेक प्रकारे सेवाही करत आहेत. अशाच एका पोलिसाचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत कौतुक केलं आहे.

अनेक स्थलांतरीत मजूर मोठ्या प्रमाणात कसारा घाटातून प्रवास करत आहे. नाशिकमधील ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये असलेले जवान सतीश चव्हाण हे याच घाटात तैनात आहेत. अशाच मजुरांचे बिघडलेले रिक्षा दुरुस्त करून देण्याचं काम सतीश चव्हाण हे जवान करताना दिसत आहे. त्यांना गाड्या दुरुस्त करणं आणि तांत्रिक गोष्टींची आवड आहे. लॉकडाऊन मुळे सर्व ठप्प असल्यामुळे वाहन चालकांना गरज पडली तर मोठ्या संकटाला समोर जाव लागत. आणि मदत मिळणं हे दुरापास्त आहे. त्यामुळे चव्हाण हे आपल्या कामासोबतच या कौशल्याचा वापर करून लोकांची ते मदत करत आहेत. कोरोना संसर्गा सारख्या अशा परिस्थितीमध्ये सतीश चव्हाणसारखे पोलीस हे देवदूतच ठरले आहे.