खासदार राजीव सातव यांच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

हिंगोली : काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी कळमनुरी या त्यांच्या मुळगावी चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. काँग्रेसचे अनेक बडे नेते अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी कळमनुरी गावी आले आहेत.

तब्बल २३ दिवस संघर्ष केल्यानंतर रविवारी राजीव सातव यांचे पुण्यात निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार मुळ गावी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुण्यातून रविवारी सकाळी एका रुग्णवाहिकेतून त्यांचा पार्थिव नेण्यात आला. कळमनुरी येथे राजीव सातव यांचा पार्थिव रात्री ९ वाजता पोहचला. त्यावेळी त्यांच्या घरासमोर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यांचे शव पहाताच अनेक कार्यकर्त्यांचे कंठ दाटून आले. यावेळी कार्यकर्त्यांनी राजीव सातव अमर रहे अशा घोषणा दिल्या.

आज सकाळपासून त्यांच्या निवासस्थानासमोरच्या मोकळ्या जागेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली आहे.

अंत्यसंस्काराचा उपस्थित राहण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार जीशान सिद्दिकी यांच्यासह अनेक नेते कळमनुरी येथे आले आहेत. शासकीय इतमामात राजीव सातव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

दरम्यान, आपल्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून कार्यकर्त्यांची मोठी रिघ लागली आहे. कार्यकर्त्यांनी दर्शनासाठी मोठी रांग लावली आहे. अनेकांना सातव यांचे पार्थिव पाहताना दु:ख आवरत नसल्याने ते मंडपातच आपल्या अश्रुंना मोकळी वाट करुन देताना दिसत आहे.