Video : जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत, घराजवळच दर्शन झाल्याने बोरी बुद्रुककरांची पाचावर धारण

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाइन – बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील कोरडे मळ्यात मंगळवारी बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

येथील कोरडे मळ्यात राहत असलेले सुरेश हनुमंता कोरडे यांच्या घराजवळ मंगळवारी (दि. 26) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या फिरताना दिसला. यावेळी त्यांनी बिबट्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईल कैद केला आहे. यावेळी कोरडे यांनी फटाके लावल्याने बिबट्याने या ठिकाणाहून पळ काढला होता. मात्र आज पुन्हा याच ठिकाणी बिबट्या येऊन बसला.

याच मळ्यात रहात असलेले बाबुराव कोरडे या शेतकऱ्याच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे. तसेच राजुरी या गावातील गटकळ मळ्यात राहत असलेले तुषार हाडवळे हा युवक आपल्या शेतात गव्हाला पाणी देत असताना अचानक बिबट्या समोर आला. त्यामुळे घाबरून तुषारने पळ काढल्याने काढला. सुदैवाने बिबट्याने हल्ला न केल्याने तो बचावला. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा, बोरी, माळवाडी, साळवाडी, जाधववाडी, राजुरी आदी गावे बिबट्या प्रवण क्षेत्रात येतात. गावामध्ये ऊसाचे क्षेत्र मोठया प्रमाणावर आहे. मात्र सध्या या परिसरात ऊस तोडणी सुरू असल्याने हे बिबटे मानवी वस्तीत येऊ लागले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दररोजच बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.