38 चाकांच्या ट्रकवर भार होता ‘या ‘मशीनचा, 34 तासांचा प्रवास करण्यास लागले एक वर्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रपासून केरळच्या तिरुवनंतपुरमकडे गाडीने प्रवास केल्यास १७०० किमीचा प्रवास ३४ तासात सहजपणे पूर्ण केला जाऊ शकतो. पण सोशल मीडियावर अशा एका ट्रकचा फोटो व्हायरल होत आहे, ज्याला हे अंतर पूर्ण करण्यास वर्षभर लागले. या ट्रकची खास गोष्ट अशी आहे की त्याला ३८ चाकं आहेत आणि त्यावर ७८ टनच्या एका मशीनचा भार आहे. ट्रक तिरुअनंतपुरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटर (व्हीएसएससी) येथे पोहोचला आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, ३८ चाकांचा हा ट्रक ९ जुलै २०१९ रोजी महाराष्ट्रातून निघाला होता. या ट्रकवर तिरुअनंतपुरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये डिलिव्हरीसाठी एक एरोस्पेस क्षैतिज ऑटोक्लेव्ह लोड आहे. या ट्रकसह उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, जुलै २०१९ मध्ये सुरू झालेला हा प्रवास ४ राज्यांतून होत आज केरळमध्ये संपेल. या ट्रकच्या सुरक्षेसाठी पोलिसांची गाडी नेहमीच त्या पुढे होती.

इतकेच नाही तर वाटेत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून रस्त्याची दुरुस्ती केली जात होती. एवढेच नाही तर ट्रकसाठी जागा कमी पडत असताना झाडेही कापली गेली होती. अनेक ठिकाणी ट्रकला जाण्यासाठी विद्युत खांब मागे घ्यावे लागले होते.

विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रकवर जी मशीन आहे ती स्वतंत्रपणे आणली जाऊ शकत नव्हती. त्यामुळे ते ट्रकद्वारे एकत्र आणणे आवश्यक होते. ते म्हणाले की, ट्रक आता विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात पोहोचला आहे, याचा आम्हाला आनंद आहे.