जळगावजवळ रेल्वे अपघाताचा मोठा अनर्थ टळला

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – अमळनेर तालुक्यातील भोणे गावाजवळ खडीने भरलेला डंपर रेल्वे जात असताना कलंडला. सुदैवाने चालकाने रेल्वे गाडी थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, यामुळे काही वेळ या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.

भोणे गावाजवळ रेल्वे ट्रॅकचे काम सुरु होते. ट्रॅकमध्ये खडी टाकण्याचे काम करण्यासाठी लोहमार्गाच्या कडेला खडीने भरलेला डंपर उभा होता. त्यावेळी अहमदाबाद हावडा एक्सप्रेस जळगावकडे जात होती. लोहमार्गाकडेला काम सुरु असल्याने चालकाने गाडी हळू केली होती. तेथून रेल्वे जात असताना कडेला असलेला डंपर अचानक घसरला व तो रेल्वेवर जाऊन धडकला. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. चालकाने तातडीने रेल्वे थांबविली. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने डंपरमधील खडी काढून टाकण्यात आली. डंपर मागे घेण्यात आला. काही वेळाने वाहतूक सुरु करण्यात आली. ठेकेदार आणि कामगारांच्या बेफिकिरीमुळे मोठा अपघात होऊन अनर्थ घडू शकला असता. सुदैवाने हा प्रकार टळला.