मुंबईमधून ‘जावई’ गावी पोहचला, मृत्यूनंतर निघाला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आणि नंतर संपूर्ण तालुका हादरला

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाइन –  देशात कोरोना संसर्गाचा प्रसार वाढू नये यासाठी लॉकडाउन करण्यात आले. परंतु, अशा परिस्थितीत देखील काही लोक रात्री-बेरात्री लपून पोलिसांचा डोळा चुकवून प्रवास करताना दिसत आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या मुंबई मधून थेट अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर पर्यंत प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला मृत्यूनंतर कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. आणि गावातील सगळ्या लोकांचा जीव टांगणीला लागला. कारण या व्यक्तीच्या संपर्कात जवळपास २०० पेक्षा अधिक लोक आले होते.

घाटकोपरमधील एक व्यक्ती पारनेर तालुक्यातील आपल्या सासरी लॉकडाऊन ला वैतागून पायी चालत गेला. लपून-छपून पारनेरमध्ये पोहचलेला हा जावई एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने तिथं गेल्यानंतर गावातील अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र, काही दिवसानंतर त्याची प्रकृती खालावली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. मृत्यनंतर केलेल्या तपासणीत आढळून आलं की, हा व्यक्ती कोरोना संसर्ग पॉझिटिव्ह होता. त्यानंतर गावातील लोकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २०० पेक्षा जास्त लोकांना आता क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

नगर शहरातील आणखी दोघांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. शहरातील शांतीनगर परिसरातील कोरोना संसर्गित आढळून आलेल्या ड्रायव्हरची २२ वर्षीय मुलगी आणि सुभेदार गल्ली येतील वृद्ध महिलेच्या संपर्कातील २० वर्षीय युवकाला कोरोना संसर्गाची लागण झाल्याचं अहवालातून स्पष्ट झाल आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या आता ६२ झाली असून, ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ४१ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आलं आहे.