‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, जयघोषाने वाघा सीमा दुमदुमली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत पाकिस्तानच्या वाघा सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव अशा अखंड घोषणांनी वाघा सीमा दुमदुमून गेली.

छत्रपती संभाजीराजे आज वाघा सीमेवरील बीटिंग रीट्रीट सोहळ्याला उपस्थित होते. काही क्षणात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज येथे आल्याची वार्ता कानोकानी पसरली आणि उपस्थितांनी एकच शिवाजी महाराज्यांच्या घोषणांना सुरुवात केली. छत्रपती संभाजीराजेंना पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. संभाजी राजे देखील यामुळे भारावून गेले. यासंबंधित एक व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

या ट्विटमध्ये त्यांनी भावना व्यक्त केल्या, ते म्हणाले की छत्रपती घराण्यावर लोक आजही जीव ओवाळून टाकतात. माझा जन्म या घराण्यात झाला यापेक्षा मोठे भाग्य जगात कोणतंही नाही. हे प्रेम, ही आत्मियता पाहून माझे मन भारावून गेले, डोळे पाणवले. महाराष्ट्राच्या मायभूमीपासून हजारो किलोमीटर दूर, आमच्या रणमर्द मावळ्यांना उत्साह, त्यांना माझ्याविषयीची प्रीती मनाला शिवणार नाही तर काय अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.


यावेळी संभाजीराजे यांनी सहकुटूंब शीख बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या सुवर्ण मंदिराला देखील भेट दिली. त्यांचे सुवर्ण मंदिरात अगत्याने स्वागत झाले. यातील काही फोटो संभाजीराजेंनी ट्विटवर शेअर केले.