धक्कादायक ! पुण्यात जन्मदात्या आईनं पाजलं ४ वर्षाच्या चिमुकलीला उंदीर मारण्याचं औषध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या चार वर्षाच्या मुलीला उंदीर मारण्याचे औषध पाजून स्वत:ही ते पिल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील नऱ्हे परिसरात घडला आहे. गोकुळा शामराव साबळे (वय-२५) असे मृत्यू झालेल्या आईचे नाव आहे. तर यामध्ये बचावलेल्या चार वर्षाच्या पुजावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी शामराव राजाराम साबळे (वय २८, शिवशक्ती पॉवर डिव्हाइस शेजारी, नऱ्हे, मूळ- सिरड, शहापूर, ता. औंढा जि. हिंगोली) याच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मृत महिलेचा भाऊ कुंडलिक भुरके (वय २८, रा. भोळवा, ता. कळमनुरी, जिल्हा हिंगोली) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शामराव आणि गोकुळा यांचे दहा वर्षापूर्वी लग्न झाले आहे. शामराव ट्रक चालक आहे तर गोकुळा साफसफाईचे काम करत होती. शामराव याला दारु पिण्याचे व्यसन असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. १९ ऑगस्ट रोजी शामराव हा नेहमीप्रमाणे सायंकाळी दारु पिऊन आला. त्यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्याने त्याने पत्नीला शिवीगाळ करुन मारहाण केली.

त्यानंतर तो घराबाहेर निघून गेल्यावर गोकुळाने शेजारच्या मेडिकलमधून उंदीर मारण्याचे औषध खरेदी करून घरी गेली. उंदीर मारण्याचे औषध स्वत: प्राशन करून मुलगी पुजाला देखील पाजले. दरम्यान दोघींना उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान गोकुळाचा मृत्यू झाला. शामराव याने बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार तिच्या भावाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली पाटील करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like