कौतुकास्पद ! मुलाला घरी आणण्यासाठी ‘सुपर मॉम’नं चालविली 1400 किलोमीटर ‘स्कुटी’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – आई आणि मुलाचे नाते अटूट असल्याचा प्रत्यय तेलंगणधील एका घटनेमुळे आला आहे. लॉकडाउनमुळे अडकलेल्या मुलाला आणण्यासाठी महिलेने स्कुटीवरुन तब्ब्ल 1 हजार 400 किमीचा प्रवास केला. महिला तेलंगणमधील रहिवासी असून मुलगा शेजारील आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे अडकला होता. 48 वर्षीय रजिया बेगम यांनी सोमवारी सकाळी प्रवास सुरु केला होता. यासाठी त्यांनी पोलिसांची परवानगीदेखील घेतली होती. रजिया बेगम यांनी नेल्लोरपर्यंत एकटीने प्रवास केला आणि बुधवारी संध्याकाळी मुलाला सोबत घेऊन परतीच्या प्रवासाला निघाल्या. तीन दिवस 1 हजार 400 किलोमीटर अंतर कापून त्यांनी मुलाला सुखरूप घरी आणले आहे.

कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. अशातच परराज्यात अडकलेल्या मुलाला परत आणण्याचा निश्चय महिलेने करून पुर्णत्वास नेला आहे. रजिया बेगम यांखस मुलगा आंध्र प्रदेशात अडकला असल्याने चिंता लागली होती. यावेळी त्यांनी स्वत: जाऊन मुलाला परत घेऊन येण्याचा निश्चय केला. मोठ्या मुलाला पाठवले तर पोलीस तो खोटे बोलत असल्याचे समजून ताब्यात घेतील अशी भीती असल्याने त्यांनी स्वत: जाण्याचे ठरवले होते. सुरुवातीला त्यांनी कारमधून जाण्याचा निर्णय घेतला होता, मात्र, कार न मिळाल्याने त्यांनी दुचाकीचा पर्याय निवडला.

6 एप्रिल रोजी सकाळी रजिया बेगम यांनी प्रवासाल सुरुवात केली आणि दुसर्‍या दिवशी संध्याकाळी नेल्लोर येथे पोहोचल्या. त्याचदिवशी त्यांनी मुलासोबत परतीचा प्रवास सुरु केला. बुधवारी संध्याकाळी आपण घरी पोहोचलो अशी माहिती बेगम यांनी दिली आहे. बेगम यांच्या पतीचे 15 वर्षांपूर्वी निधन झाले असून दोन मुलांसोबत त्या राहतात. एका मुलाचे इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाले आहे. तर दुसरा मुलगा निजामुद्दीनची डॉक्टर होण्याची इच्छा आहे. निजामुद्दीन 12 मार्च रोजी आपल्या मित्राला सोडण्यासाठी नेल्लोर येथे गेला होता. यानंतर तो तिथेच राहिला होता. तितक्यात लॉकडाउन जाहीर झाला आणि निजामुद्दीनच्या परतीचा मार्ग बंद झाला.