बुलेट ट्रेनचे २० ट्रॅक जपानहून मुंबईत आले, बडोद्यात पोहोचले 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला चांगलाच वेग आल्याचे दिसत आहे. कारण, जपानहून पहिली कंसाइनमेंट (मालवाहतूक) मुंबईमार्गे बडोद्यामध्ये पोहोचली आहे. यामध्ये २५० टन वजनाच्या २० स्लीपर स्लॅब ट्रॅक आहेत. जपानहून हे २० ट्रॅक सर्वप्रथम मुंबई पोर्टवर आले, तेथून ते बडोद्याकडे पाठवण्यात आले.

२०२२ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशातील पहिली बुलेट ट्रेन सुरू करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. मात्र, जमिन अधिग्रहण आणि अन्य प्रक्रियांमध्ये वेळ गेल्याने प्रकल्पास उशीर होऊ शकतो, २००२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. २०२३ मध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास येईल, असे नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने म्हटले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बडोदा स्थानकाचे डिझाइन देखील तयार झाले आहे. तसेच बुलेट ट्रेनच्या संचालनासाठी बडोद्यामध्ये प्रशिक्षण अकादमी देखील सुरू आहे.

बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर रोज ७० फेऱ्या मारेल. गर्दीच्या वेळी (सकाळी ७ ते १० आणि संध्याकाळी ५ ते ९ पर्यंत) तीन बुलेट ट्रेन धावतील असा प्रस्ताव आहे, तर गर्दी नसताना दोन बुलेट ट्रेन धावतील. या मार्गावर बीकेसी, ठाणे, विरार, बोइसर, वापी, बिलीमोरा, सूरत, भरूच, बडोदा, आणंद, साबरमती आणि अहमदाबाद ही १२ स्थानकं असतील. एनएचएसआरसीएल हाय स्पीड आणि स्लो अशा दोन ट्रेन चालवणार आहेत. हाय स्पीड ट्रेन मुंबई, सूरत, बडोदा आणि अहमदाबाद या स्थानकांवर थांबेल तर स्लो ट्रेन या मार्गावरील १२ स्थानकांवर थांबेल.