बारामती एमआयडीसी परिसरात सराईत ‘छोटा विमल’चा खुन

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन

बारामती एमआयडीसी परीसरात ‘छोटा विमल’ नावाने ओळखला जाणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा खुन करण्यात आला. पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरुन फिर्यादी यांच्या घरावर गुरुवारी (दि.२७) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दगडफेक केली. यावेळी संतप्त झालेल्या फिर्य़ादीच्या नातेवाईकांनी त्याला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

अक्षय उर्फ छोटा विमल कांतीलाल जमदाडे (वय २०) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7585115d-7ba7-11e8-b3ff-8d54c07fcfff’]

मिळालेल्या माहितीनुसार, हौसेराव देवकाते यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. जमदाडे याने त्यांना दोन ते तीन महिन्यांपूर्वी खंडणी मागितली होती. देवकाते यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी जमदाडे याला अटक केली होती. अटक केल्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृत करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वीच तो येरवडा कारागृहातून सुटून आला होता.

गुरुवारी मध्यरात्री त्याने पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरुन देवकाते यांच्या घऱावर दगडफेक केली. संतप्त झालेल्या देवकाते आणि त्यांच्या नातेवाईकांनी जमदाडे याला मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ८ ते ९ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

मयत अक्षय उर्फ छोटा विमल हा सराईत गुन्हेगार आहे. अल्पवयीन असतानाच त्याच्यावर पोलिसांकडे १५ गुन्हे दाखल होते. पुढील तपास बारामती शहर पोलीस करीत आहेत.