प्रकाश आंबेडकरांना रोखण्यासाठी काँग्रेस आघाडीचा नवा फॉर्म्युला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रकाश आंबेडकरांच्या मनात काँग्रेस आघाडी सोबत जायचे नसल्याचे चित्र सध्या त्यांच्या राजकीय हालचालीतून दिसते आहे. त्यामुळे काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला शह देण्यासाठी नवीन फॉर्म्युला आखला आहे. याबाबत दिल्लीतून सूत्र हलवली जात आहेत.

दलित आणि मुस्लिम मतांची बेगमी करून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या प्रकाश आंबेडकर यांना कसे रोखायचे हा काँग्रेसला पडलेला मोठा सवाल आहे. कारण प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीचा सर्वाधिक तोटा हा काँग्रेस राष्ट्रवादीलाच होणार आहे. यावर तोडगा म्हणून काँग्रेसने आता महाराष्ट्रातील सपा आणि बसपाला सोबत घेऊन निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरातील मतदार संघात काँग्रेसला दलित आणि मुस्लिम मतांची साथ मिळणार नाही म्हणून या ठिकाणी समाजवादी पार्टी मदत करू शकते असे काँग्रेस नेत्यांना वाटते आहे. मुंबई महानगरात आमदार अबू आझमी यांनी मुस्लिम समाजात समाजवादी पक्षाचे चांगले संघटन बांधले आहे. त्याच संघटनांवर काँग्रेस नेत्यांचा डोळा आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात बहुजन समाज पक्षाचा चांगला प्रभाव आहे. सध्या शहरी दलित मतदार थोड्या बहुत प्रमाणात बसपाच्या बाजूने वळला आहे. बसपाने राज्यभर आपले तगडे संघटन उभा केले आहे. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन आंबेडकरांच्या दलित-बहुजन या बेरजेच्या राजकारणाला शह देण्याचा काँग्रेस प्रयत्न करते आहे. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातील सर्वच जागा लढण्याच्या तयारीत आहे. तर २२ जागी प्रकाश आंबेडकरांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.