महाराष्ट्र काँग्रेसकडून ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’ चं प्रकाशन ; प्रचाराचा नवा फंडा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून प्रत्येक पक्ष एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. मतदारांपर्य़ंत आपले म्हणणे पोहचवण्यासाठी आणि विरोधकांनी केलेल्या चुकीच्या कामांची माहिती देण्यासाठी विविध पक्षांकडून पत्रके काढली जातात. मात्र, महाराष्ट्रात काँग्रेसने प्रचाराचा नवीन पॅटर्न सुरु केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने आज ‘मोदींच्या १०० चुका’ पुस्तक प्रकाशीत करत प्रचाराच्या नव्या पॅटर्नची सुरुवात केली आहे.

सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र काँग्रेस पक्षाने प्रकाशीत केलेल्या या पुस्तकामुळे या प्रचाराच्या नवीन पॅटर्नची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. या पुस्तकामध्ये मोदींच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या १०० चुकांची माहिती देण्यात आली आहे. आज प्रकाशीत करण्यात आलेले पुस्तक मतदारांमध्ये पोहचवण्यात येणार आहे.  पाच वर्षात घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय कसे चुकीचे आहेत हे या पुस्ताकातून मांडण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. तसेच चौकीदार भागीदार झाल्याचा दावा या पुस्तकाच्या माध्यमातून काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.

काँग्रेसच्या वतीने प्रकाशीत करण्यात आलेल्या पुस्तकामध्ये राफेल, जीएसटी, नोटाबंदी, समृद्धी महामार्ग यावरुन भाजपवर आरोप करण्यात आले आहेत. राफेलचा सौदा ; अंबानींचा फायदा, मनमानी जीएसटी जनता दु:खी कष्टी, नोटाबंदीचा फेरा ; अर्थव्यवस्थेचे तीन-तेरा, समृद्धीचा नांगर शेतकरी बेघर, जलयुक्त शिवार ; पाण्यातही भ्रष्टाचार या शिर्षकाखाली मोदी सरकारच्या चुका दाखवण्यात आल्या आहेत. नोटाबंदीमुळे देशातील उद्योगधंदे कशा प्रकारे देशोधडीला लागले हे सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यासह वेगवेगळे मुद्दे पुस्तकाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केला आहे.

Loading...
You might also like