राज्याच्या राजकारणात नवा ‘ट्विस्ट’, राज्यपाल राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचं निमंत्रण देणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाली असून लवकरच निर्णय घेतला जाईल असं वक्तव्य काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी केलं आहे. माध्यमांशी ते बोलत होते. राज्यपालांनी प्रथम भाजपाला आणि नंतर शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होतं. मात्र, दोन्ही पक्षही सत्ता स्थापन करू शकले नसल्यानं राज्यात तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपाल सत्तास्थापनेचं निमंत्रण देणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचं उत्तर देखील आगामी काही तासात मिळणार आहे. राज्यपालांनी केवळ शिवसेनेला वेळ वाढवुन देण्यास नकार दिला आहे. त्यांच्या सत्ता स्थापनेचा दावा खारिज केला नाही असं शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.

राजीव सातव म्हणाले, “सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली आहे. लवकरच दोन्ही पक्ष मिळून एकत्रितपणे निर्णय घेतील.” तीन तास झालेल्या या बैठकीनंतर राजीव सातव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही पक्ष नेमका काय निर्णय घेणार आहेत आणि शिवसेनेला त्यांचा पाठिंबा असणार आहे का असा प्रश्न पत्रकाराने विचारल्यानंतर सातव यांनी मौन बाळगलं.

दरम्यान सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेनेची मुदत नुकतीच संपली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षाचा शिवसेनेला पाठिंबा नव्हता. त्यामुळे ते सत्ता स्थापनेचा दावा करू शकले नाहीत.

पृथ्वीराज चव्हाण यांनाही माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी काही बोलण्यास नकार दिला. आमची चर्चा सुरु आहे. सोनिया गांधी आणि शरद पवार चर्चा करत आहेत आणि ही चर्चा सुरुच राहिल असे त्यांनी सांगितले.

Visit : Policenama.com