आषाढी वारी ! ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर मानाच्या 4 पालख्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या महामारीमुळे यंदा आषाढी वारी होणार की नाही, असा संभ्रम वारकरी संप्रदायासह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेमध्ये निर्माण झाला आहे. यासंदर्भात मानाच्या सातपैकी चार पालख्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा मानाच्या चार पालख्या रद्द करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात एकनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांनी माहिती दिली.

सात मानाच्या पालख्यांपैकी पैठणची एकनाथ महाराज पालखी, त्र्यंबकेश्वरची निवृत्तीनाथ महाराज पालखी, जळगावच्या मुक्ताईनगरची मुक्ताईनगर पालखी आणि सासवडची सोपानकाका पालखी यांनी यावर्षी कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नेहमीचा पालखी सोहळा रद्द करताना परंपरा चालू ठेवण्यासाठी काही पर्यायही या पालख्यांनी सरकारला दिले आहेत. त्यापैकी सरकार जी परवानगी देईल, त्यानुसार पालखी सोहळा करण्याची तयारी असल्याचे रघुनाथ महाराज गोसावी यांनी सांगितले आहे. प्रस्थानाच्या दिवशी सरकारच्या नियमात राहून प्रस्थान होईल आणि दशमीपर्यंत पालखी सोहळा त्याच गावी मुक्काम राहील. म्हणजे पैठणमध्ये नाथांच्या जुन्या वाड्यापासून दिंडी समाधी मंदिरापर्यंत येईल आणि दशमीपर्यंत तिथेच मुक्काम करेल. दशमीला तीस मानकर्‍यांना पंढरपूरला जाण्याची परवानगी मिळावी अशी त्यांची मागणी आहे.

आळंदी आणि देहू संस्थाननेही मोजक्याच वारकर्‍यांना घेऊन पंढरपूरला पालखी नेण्याचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पालखी प्रमुख आणि पालखीशी संबंधित पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन चर्चा केली होती. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वारकरी प्रतिनिधींशी संवाद साधला होता. वारीची असंख्य वर्षांची परंपरा खंडित होणार नाही, अशा विश्वास त्यांनी दिला होता. याबाबत सरकारशी चर्चा होणार असून या महिनाअखेरीस म्हणजे 29 मे रोजी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.