आंबेडकरी विचारवंत डॉ. अविनाश डोळस यांचे निधन

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य व प्रकाशन समितीचे माजी सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस यांचे रविवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नंदनवन कॉलनी येथे राहत्या घरी आज पहाटे ६ वाजता प्रा. अविनाश डोळस यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. भीमनगर, भावसिंगपुरा येथे त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात मराठी विषयाचे ते प्राध्यापक होते. मराठी विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात त्यांचा पुढाकार होता. भारतीय रिपब्लिकन पक्ष- बहुजन महासंघाचे नेते असलेले डोळस हे दलित, कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी लेखणीही समर्थपणे चालवणारे साहित्यिक होते. जानेवारी १९९० मध्ये नांदेड येथे भरलेल्या पाचव्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. जानेवारी २०११ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे भरलेल्या १२ व्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.

डोळस यांची साहित्य संपदा :  आधारस्तंभ : प्राचार्य ल. बा. रायमाने,  आंबेडकरी चळवळ : परिवर्तनाचे संदर्भ, आंबेडकरी विचार आणि साहित्य ,  महासंगर (कथासंग्रह), सम्यकदृष्टीतून.

Loading...
You might also like