मुंबई एक महिन्याच्या ‘योध्या’नं ‘कोरोना’ला हरवलं, डॉक्टर आणि स्टाफनं दिला ‘असा’ निरोप (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लोकांची चिंता वाढली असताना दुसरीकडे दिलासा देणाऱ्या काही घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना समोर आली असून सायन रुग्णालयात दाखल एक महिन्याच्या बाळाने कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर मात केल्यानंतर बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी नर्स, डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून बाळ आणि त्याच्या आईला निरोप दिला.

बाळाला निरोप देतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओत बाळाची आई त्याला कुशीत घेऊन वॉर्डमधून बाहेर येत असताना नर्स, डॉक्टर आणि कर्मचारी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करत असल्याचं दिसत आहे. कोरोनावर मात करणारं हे सर्वात लहान वयाचं बाळ ठरलं आहे. व्हिडिओ व्हायरल होऊ लागल्याने नेटिझन्सदेखील सायन रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच कौतुक करत आहेत.

दरम्यान, एप्रिल महिन्यात दोन महिन्यांच्या बाळाने कोरोनावर मात केली होती. 22 एप्रिल रोजी बाळाला त्याच्या तीन वर्षाची बहिण आणि आईसोबत सैफी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. तर इंदूर येते दोन महिन्यांचं बाळ कोरोना पॉझिटिव्ह आढळलं होतं. खासगी रुग्णालयात बाळाला दाखल करण्यात आलं होतं. कोरोनावर मात केल्यानंतर बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले होते.