श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराच्या पदाधिकार्‍यास जम्मू-काश्मीरहून कुरिअरनं आलं पार्सल, झाली धावपळ अन्…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नवसाला पावनाऱ्या दगडूशेठ गणपती मंदिराच्या पदाधिकाऱ्यास जम्मू काश्मिरवरून कुरिअरने आलेल्या पार्सलने चांगलीच धावपळ उडाली. आज हे पार्सल सायंकाळी मिळाल्यानंतर बीडीडीएस आणि पोलीसांनी धाव घेतली आणि ते पार्सल ताब्यात घेतले. पार्सल संशयास्पद असल्याने त्याला रमनबाग मैदानावर नेहून श्वानाच्या मदते पार्सल उघडल्यानंतर त्यामध्ये आकरुड व केशर निघाले. यानंतर पोलिसांनी व नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

दगडूशेठ मंदिराचे पदाधिकारी महेश सुर्यंवशी यांना सोमवारी मारुती कुरिअरने एक पार्सल आले होते. त्याच्यावर जम्मू काश्मिर येथील पत्ता होता. तसेच, त्याच्यावर इकबाल नाव होते. त्यामुळे त्यांना पार्सलबाबत संशय आला. त्यांनी थेट पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला आणि त्याची माहिती दिली. माहिती मिळताच बॉम्ब शोधक व नाशक पथकाला (बीडीडीएस) व विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पूर्वी देखील स्फोटक असलेली पार्सल आल्याने पोलिसांकडून विशेष काळजी घेण्यात आली. बीडीडीएसच्या पथकाने सुर्यवंशी यांच्या घरी धाव घेतली. त्यांनी त्या स्फोटकाची पाहणी केली.

सुरक्षिततेच्या कारणावरुन बीडीडीएसने तो पार्सलचा बॉक्स रमनबाग मैदानावर मोटारीतून नेला. त्या ठिकाणी बॉम्बसुट घालून किटच्या सहाय्याने त्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यामध्ये स्फोटके नसल्याचे दिसून आले. यानंतर बॉक्स उघडून पाहिला असता त्यामध्ये केशर व आकरूड निघाले. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.

सुर्यंवशी यांनी गणेश मुर्ती दहा मराठा बटालियनला पाठविली होती. त्यामुळे कृतज्ञाता म्हणून सुभेदार महादेव पवार यांनी जम्मू काश्मिर येथील दुकानदाराला आकरूड व केशर महेश सुर्यवंशी यांच्या पत्त्यावर पाठविण्यास सांगितले. संबंधित दुकानदाराने पार्सल सुभेदार पवार यांच्या नावाने न करता आपल्या स्वत: च्या नावाने पार्सल केले. ते पार्सल आल्यानंतर त्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी त्या पार्सलवर असलेल्या दुकानदाराच्या मोबाईल क्रमांकांवर फोन केला. पण, तो लागला नाही. परत प्रयत्न केल्यानंतर फोन लागला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. दुकानदाराने पवार यांच्या ऐवजी त्याचे नाव टाकल्यामुळे हा गोंधळ झाल्याचे चौकशीत समोर आले आहे. बीडीडीएसने ते पार्सल विश्रामबाग पोलिसांकडे दिले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like