पिंपरी- चिंचवड : निगडीत दिवसाढवळ्या तरुणाचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   गुन्हेगारी टोळी युध्दामुळे पुन्हा एकदा उद्योगनगरी हादरली आहे. 6 जणांच्या टोळक्‍याने एका तरुणाचा निर्घृण खून केला. सोमवारी (दि.19) निगडी ओटास्कीम परिसरात ही घटना घडली. त्यानंतर घटनेचा बदला घेण्यासाठी म्हणून मंगळवारी दुपारी प्रतिस्पर्धी टोळीने आरोपींच्या मित्रांवर खूनी हल्ला चढवला. ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. दरम्यान कोरोनाच्या फैलावामुळे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यांचे पालन नागरिकांकडून करवून घेण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. तरीही टोळीयुद्धासारख्या घटना घडत आहेत. यामुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे

आकाश उर्फ मोन्या कांबळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सोहेल जाधव याच्यासह त्याच्या 5 साथीदारांवर निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोहेल याला मृत आकाशने काय रे कुठे चाललाय असे रागात विचारले होते. त्याचा राग मनात धरून तक्रारदार आणि मृत आकाश बोलत थांबलेले असताना सोहेलच्या मित्राने आकाशवर कोयत्याने हल्ला करून त्याचा खून केला. परिसरात दहशत निर्माण करून आरोपी पसार झाले. आकाशचा खून झाल्यानंतर त्याचे मित्र बदला घेण्यासाठी तयार असण्याची शक्यता लक्षात घेऊन त्या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवणे आवश्यक होते. मात्र, तशी परिस्थिती न दिसल्याने मृत आकाशच्या चिडलेल्या मित्रांनी शक्‍तीमान आणि प्रकाश कांबळेला गाठून त्यांच्यावर सिमेंटचे गट्टू आणि लाकडी दांडक्‍याने खुनी हल्ला चढवला. एकामागोमाग घडलेल्या दोन गंभीर स्वरुपाच्या घटनांमुळे निगडी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.