२,५०,००० रुपये पगार घेणारा बनला सोनसाखळी चोर

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नशीब फिरले की घराचे वासेही फिरतात, अशी म्हण आहे. पुण्यातील कंपनीत उपाध्यक्ष म्हणून दर महा अडीच लाख रुपये पगार घेत होता. पण, त्याचे नशीब फिरले आणि आता पोलिसांनी त्याला कार चोरी आणि सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

 सुमित सेनगुप्ता (वय ३५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने  कौटुंबिक कारणामुळे दरमहा अडीच लाख रुपयांची नोकरी सोडली होती अस पोलीस तपासात समोर आले आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सुमितने एका मोठ्या शैक्षणिक संस्थेतून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून तो पुण्यातील एका चांगल्या कंपनीत काम करत होता.  २०१५ मध्ये सुमितच्या पत्नीने त्याच्याविरोधात वाशी पोलीस ठाण्यात छळाप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. वैयक्तिक कारणांमुळे तो त्रस्त होता. नोकरी नसल्यामुळे हाय – फाय जीवन जगणारा सुमित पैशांअभावी त्रासला  होता. त्याला दारुचे व्यसन जडले होते.

वाशी पोलिसांनी  १२ डिसेंबरला वाशीत महिलेची सोनसाखळी चोरल्याप्रकरणी २४ तासांच्या आत सेनगुप्ता आणि त्याचा सहकारी नितीन अग्रवाल (वय २५) याला अटक केली होती. जेव्हा त्यांनी सोनसाखळी चोरली. तेव्हाही ते चोरीच्या कारमध्ये होते. ९ डिसेंबर रोजी वाशीतील फोर्टिस रुग्णालयाबाहेर वाहन चालकाला मारहाण करुन सुमितने गुन्ह्यासाठी वापरलेली कार पळवली होती.

कार चालकाला घाबरवण्यासाठी त्याने त्याच्या डोक्याला लोखंडाची बंदुकीसारखी वस्तू लावली होती. कार चोरल्यानंतर ३ दिवसानंतर त्याने सोनसाखळी चोरी केली. २०१७ मध्ये वाशी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात आणखी एका चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्याविरोधात आणखी दुसऱ्या कुठल्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे की याबाबत पोलीस माहिती गोळा करत आहेत.