रिअल हिरो ! कर्करोग झालेल्या रूग्णास औषध पोहचवण्यासाठी ‘या’ पोलिसानं केला चक्क 960 KM चा प्रवास

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन असून सर्वांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहेे. याकाळातही पोलीस आणि डॉक्टर्स समाजाप्रती कर्तव्य बजावण्यातून मागे हटत नाहीत. कर्नाटकातील एका पोलीसाने जबाबदारी पार पाडत तब्बल 960 किलोमीटरचे अंतर दुचाकीवर पार केले आहे. लॉकडाउनमुळे घरात अडकलेल्या आणि कर्करोग झालेल्या रुग्णाला त्याच्या घरापर्यंत औषध पोहोचविण्याचे काम पोलिसाने केले आहे.

एस. कुमारस्वामी असे या पोलिसाचे नाव आहे. ते बंगळुरू शहरातील पोलीस कंट्रोल रुममध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. त्यांना गेल्या आठवड्यात एका स्थानिक वाहिनीवर धारवाडमध्ये राहणार्‍या एका कर्करोगाच्या रुग्णावर आलेला प्रसंग माहित झाला होता. रुग्णाने बोलताना औषध हे केवळ बंगळुरूमध्येच मिळत असल्याचे सांगितले होते. शिवाय 12 एप्रिलपर्यंत आपल्याला हे औषध मिळणे आवश्यक असल्याचेही म्हटले होते यानंतर कुमारस्वामी यांनी त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचा निर्णय घेतला होता.

सकाळी कर्तव्य बजावल्यानंतर ते वाहिनीच्या कार्यालयात पोहोचले. त्या ठिकाणाहून त्यांनी त्या रुग्णाचा मोबाईल नंबर घेतला आणि औषधाच्या बाबतीत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी ते औषध बंगळुरूतील इंद्रानगर येथील डीएस रिसर्च सेंटर येथे मिळेल असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे धारवाडला जाण्याबाबत परवानगी मागितली. नंतर त्यांनी आपल्या कुटुंबीयांनाही याबाबत माहिती दिली. औषध घेऊन त्यांनी 11 एप्रिल रोजी सकाळी 4 वाजता प्रवास सुरू केला आणि त्याच दिवशी दुपारी अडीच वाजता ते त्यांच्या घरी पोहोचले. संपूर्ण प्रवासादरम्यान वेळ जाऊ नये यासाठी त्यांनी केवळ बिस्कीट आणि पाणी पिऊनच प्रवास केला. ते एवढ्या लवकर आपल्या घरापर्यंत पोहोचले हे पाऊन रुग्णाच्या घरच्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.