ऐतिहासिक ‘चारमिनार’च्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर ; इमारतीचा भाग कोसळला

हैदराबाद : वृत्तसंस्था – हैदराबाद शहराची ओळख असलेला ऐतिहासिक चारमिनार बुधवारी रात्री चारमिनारच्‍या वरच्‍या मजल्‍याचा काही भाग अचानक कोसळला. या घटनेमुळे चारमीनार इमारतीच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी चारमीनारच्या पश्चिमेकडील भागातील एक मोठा हिस्सा तुटला होता. राज्याच्या पुरातत्व विभागाने काही दिवसांपूर्वीच या इमारतीची डागडुजी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार,  बुधवारी रात्री चारमिनारच्‍या वरच्‍या मजल्‍याचा काही भाग अचानक कोसळल्‍याने चारमिनारला नुकसान पोहोचले आहे. यामुळे या भागात काहीवेळ गोंधळ निर्माण झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ऐतिहासिक चारमिनारला भेट देण्यासाठी  देश-विदेशांतील हजारो पर्यटक चारमीनारला भेट देत असतात. या इमारतीची स्थिती नाजूक असल्याने पर्यटकांना सध्या पहिल्या मजल्यापर्यंतच जाण्याची परवानगी दिलेली  आहे.

चारमिनार विषयी –

चारशे वर्षांपूर्वी बांधलेला चारमिनार हा वास्तुकलेचा उत्कृष्ठ नमुना आहे. मोहम्मद कुतुबशाह याने सन १५९१ मध्ये या ऐतिहासिक इमारतीची निर्मिती केली होती. चारमिनार म्हणजे चार मिनारांनी मिळून बनलेली एक चौरसाकार प्रभावशाली इमारत आहे. १५९१ मध्ये शहरातील प्लेगची साथ संपल्याच्या आनंदात चारमिनार बांधण्यात आला.