रेल्वेच्या शौचालयामध्ये प्रसुती, पालघरमध्ये धावत्या ट्रेनमध्ये महिलेने दिला बाळाला जन्म !

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – वांद्रे-गाजिपूर या एक्सप्रेस रेल्वेत प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेची प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे. गुडिया विश्वकर्मा असे या महिलेचे नाव असून तिने वांद्रे- गाजिपूर डाऊन ट्रेनच्या एस १२ या डब्यात बाळाला जन्म दिला आहे. सध्या बाळ आणि बाळाची आई दोघेही सुरक्षित आणि सुखरुप असून रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

मूळचे उत्तरप्रदेश येथील रहिवाशी असलेले राजेश विश्वकर्मा हे आपली गर्भवती पत्नी गुडिया
आणि पाच वर्षीय मुलीसोबत रविवारी (१नोव्हेंबर) च्या रात्री वांद्रे-गाजिपूर आपल्या गावाकडे निघाले होते. वांद्रे स्थानकावरुन गाडी निघाल्यावर विरार स्थानकात येताच गुडिया यांना प्रसूती वेदना सुरु झाल्या. गुडिया यांनी वेदना सुरु झाल्यावर थेट रेल्वेच्या शौचालयात जात बाळाला जन्म देण्याचा प्रयत्न केला.

राजेश विश्वकर्मा यांनी याची माहिती टीटीईला दिली. परत याबाबत नियंत्रण कक्षाला कळवण्यात आले. पश्चिम रेल्वे प्रशासनाला ही बाब माहिती झाल्यावर त्यांनी या रेल्वेला पालघर येथे थांबा देण्याचे ठरवले. पण पालघर स्थानकावर रेल्वे येण्यापूर्वीच महिलेची प्रसूती झाली. तिने गोंडस मुलाला जन्म दिला.

दरम्यान, पालघर रेल्वे प्रशासनाने बालरोग तज्ञ आणि स्त्री रोगतज्ज्ञ यांना पाचारण करत रुग्णवाहिका सज्ज ठेवली होती. त्यानंतर या महिलेच्या प्रसूत झालेल्या बाळास प्रसूती नंतरची प्रक्रिया पूर्ण करत वैशाली नर्सिंग होमचे डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी आपल्या रुग्णालयात दाखल केले. या महिलेकडून एकही रुपया न घेता डॉ. चव्हाण यांनी मोठेपण दाखवत सर्व उपचार आपल्या रुग्णालयात केले.