कोर्टाच्या आदेशानंतर बलात्कारातील आरोपीशी पीडितेचा विवाह, भारतातील ‘या’ जेलमध्ये झाला सोहळा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओडिसामध्ये पॉक्सो (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस अ‍ॅक्ट) कोर्टाच्या एका निर्णयानंतर एका बलात्कार पीडितेचा विवाह तिचे लैंगिक शोषण करणार्‍या व्यक्तीसोबत करून देण्यात आला. कोर्टाच्या आदेशानंतर या दोघांचा विवाह कारागृहाच्या आतच लावून देण्यात आला. विवाहानंतर महिला आपल्या सासरीसुद्धा आली आहे तर आरोपी अजूनही कारागृहामध्ये आहे.

सर्कल कारागृहाचे अधीक्षक कुलामनी यांनी या प्रकरणी म्हटले की, 23 वर्षांच्या राजेश सिंहवर आरोप आहे की, त्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. पॉक्सो कोर्ट आणि डीजीच्या आदेशानंतर या दोघांचा विवाह लावून देण्यात आला आहे. मागील महिन्यातच या मुलीचे वय 18 वर्ष झाले होते.

राजेश सिंहवर आरोप आहे की, त्याने मागील वर्षी या तरूणीवर बलात्कार केला होता. त्यावेळी या तरूणीचे वय 17 वर्ष होते. ती प्रेग्नंट झाली होती आणि आता ती एका मुलाची आई आहे. हा विवाह सोहळा पार पडल्यानंतर महिला आपल्या सासरी जाऊन राहू लागली आहे तर राजेश सातत्याने आपल्या जामीनासाठी प्रयत्न करत आहे.

राजेशच्या जामीन अर्जावर पुढील महिन्यात सुनावणी होईल. या प्रकरणात पॉक्सो कोर्टाने मागील महिन्यात राजेशच्या जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान म्हटले होते की, त्याच्या जामीनाबाबत तेव्हाच विचार केला जाऊ शकतो जेव्हा तो या तरूणीशी विवाह करेल.

कारागृह प्रशासनाने स्थानिक एनजीओच्या मदतीने या विवाहाची तयारी पूर्ण केली होती. या विवाहाला दोघांच्या कुटुंबाचे सदस्य, काही मित्र आणि पॉक्सो कोर्टाचे अ‍ॅडव्होकेट सुद्धा सहभागी झाले होते. याशिवाय एक वेडिंग रिसेप्शनसुद्धा ठेवण्यात आले होते, जे कारागृहाच्या काही सदस्यांनी सुद्धा अटेंड केले होते.