‘कोरोना’ व्हायरसची ‘महामारी’ आताच ‘नष्ट’ होण्याची शक्यता कमी, सन 2022 पर्यंत चालू राहणार ‘प्रकोप’ : रिपोर्ट

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – कोरोनाची साथ पुढील दोन वर्षे कायम राहणार असल्याचा दावा तज्ञांनी एका अहवालातून केला आहे. जगाच्या लोकसंख्येतील दोन तृतीयांश लोकसंख्या कोरोनामधून मुक्त होत नाही तोपर्यंत कोरोना व्हायरस नष्ट होणार नाही असे अहवालात सांगण्यात आले आहे. अनेक लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नसून त्यांच्यातून इतरांनाही लागण होत असल्याने नियंत्रण मिळवणं अशक्य आहे, असा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. मिनेसोटा विद्यापीठाच्या संसर्गजन्य रोग संशोधन आणि धोरण केंद्राने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र आता काही देश पूर्वकाळजी घेत काही उद्योग आणि सार्वजनिक ठिकाणांरील बंधनं उठवत आहेत. मात्र, कोरोनाचे विषाणू इतक्या लवकर नष्ट होणार नाहीत. 2022 पर्यंत कोरोनाच्या साथीची लाट येत राहील असंही अहवानात नमूद करण्यात आले आहे.

अहवालामध्ये नमूद करण्यात आल्यानुसार, सरकारने ही साथ लवकर जाणार नाही याची नोंद सरकारी अधिकाऱ्यांनी करणं गरजेचं आहे. तसंच लोकांना किमान दोन वर्ष या साथीचा सामना करण्यासाठी तयार राहण्याची सूचना देणं गरजेचं आहे. संशोधक लस बनवण्यात व्यस्त आहेत, ती जर या वर्षात तयार झाली तरी कमी प्रमाणात ती उपलब्ध होईल. कारण 2009-10 मध्ये आलेल्या फ्ल्यू महामारीची लस आतापर्यंत उपलब्ध झालेली नाही. तोपर्यंत अमेरिकेत फ्ल्यूचा प्रकोप मोठ्या प्रमाणात झाला होता.

हा अहवाल CIDRAP चे संचालक मायकल ओस्टरहोम, मेडिकल संचालक क्रिस्टेन मूर, तुलेन युनिव्हर्सिटी चे पब्लिक हेल्थ हिस्टोरियन जॉन बॅरी आणि हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या एपिडेमिओलॉजिस्ट मार्क लिपिसच यांनी लिहिली आहे.