आढावा बैठकीमुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्यास मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी ऑगस्टमध्ये पुणे पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी घेतल्यानंतर अनेक नवीन उपाययोजना सुरु केल्या आहेत. यामध्ये दर मंगळवारी आढावा बैठक (टीआरएम) ही त्यापैकी एक. मंगळवारी आयोजीत करण्यात येणाऱ्या आढावा बैठकीमुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्यास मदत होत आहे. तसेच नागरिकांच्या समस्यांवर योग्य उपाययोजना आणि सद्य स्थितीची माहीती मिळण्यास मदत होत असल्याचे पुणे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी सांगितले.

टीआरएम दरम्यान, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी आलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे. १ सप्टेंबर २०१८ पासून प्रत्येक पोलिस स्टेशनला सर्व्हिस एक्सीलेंस अँड व्हिक्टीम असिस्टन्स’ (सेव्हीए) नावाची प्रणालीवर सुरु करण्यात आली असून दोन पोलिस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलीस स्टेशन येथे आपल्या विविध कामासाठी दररोज सरासरी २५० ते ३०० नागरिक पोलीस स्टेशनला भेट देत असतात. पोलिस स्टेशनला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती सेवा टॅबमध्ये घेतील जाते. त्यानंतर नागरिकांची नोंद मुख्य नियंत्रण कक्ष येथील ‘सेवा कार्यप्रणाली’ कार्य़ालयात घेतली जाते. याठिकाणी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांशी संपर्क साधून पोलीस स्टेशनमधील कामासंदर्भात समाधानी आहात की नाही याची माहिती घेतली जाते.  १५ नोव्हेंबरपर्यंत एकूण १० हजार १९७ लोकांनी पोलीस ठाण्यांना भेट दिली आहे. यामध्ये फक्त २३२ लोक पोलिसांच्या सेवे बाबत संतुष्ट नसल्याचे स्पष्ट झाले.

५ सप्टेंबरपासून सर्व पोलिस नियंत्रण कक्षाच्या व्हॅनमध्ये जीपीएस बसवण्यात आले आहे.  जेव्हा एखादा व्यक्ती अडचणीत सापडला असल्याचा कॉल नियंत्रण कक्षाला येतो. त्यावेळी त्या व्यक्तीच्या जवळ असणाऱ्या पोलीस व्हॅनला त्या ठिकाणी पाठवण्यात येते. जेणे करुन संकटात सापडलेल्या व्यक्तीला तात्काळ मदत मिळाते. त्याचप्रमाणे पासपोर्ट व्हेरिफिकेशनची प्रलंबीत प्रकरणाचे प्रमाण ०.४ टक्क्यांनी कमी झाले आहे. आत्तापर्यंत १ लाख २७ हजार १५५ पैकी फक्त ५६५ अर्ज प्रलंबित आहेत.

पुणे शहर स्मार्ट सिटी बनण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे शहर पोलिसांनी विविध जंक्शनमधून भिकारी हलवण्याच्या मोहिमेस सुरूवात केली आहे. या भिकाऱ्यांना रिसेप्शन सेंटर आणि आश्रयस्थळी पाठविली जात आहे. गेल्या तीन महिन्यांत १३५ भिकाऱ्यांवर कारवाई केली गेली आहे.

बऱ्याचदा लोक वाहतूक पोलिसाशी भांडत असतात. अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी वाहतूक शाखेकडे १७ बॉडी कॅमेरे आहेत. यामध्ये भांडणाऱ्या व्यक्तीचे चित्रीकरण होणार असून त्याद्वेरे भांडणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येणार आहे. वाहतूक शाखेकडे असलेली कॅमेऱ्याची संख्या कमी असून ती १०० पर्यंत वाढवण्यात येणार आहे.

मंगळवारी झालेल्या बैठकीला सह आयुक्त शिवाजी बोडखे, अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, सुनील फुलारी, रवींद्र सेनगावकर, साहेबराव पाटील, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, अशोक मोराळे, ज्योति प्रिया सिंग, सुहास बावचे, बच्चन सिंह, मंगेश शिंदे, प्रसाद अक्कानूरु, प्रकाश गायकवाड, तेजस्वी सातपुते, स्पप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, भानुप्रताप बर्गे तसेच पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि प्रभारी उपस्थित होते.